India Morning News
मुंबई : ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात हालचाल सुरू झाली आहे. मात्र, या पाऊलावर उत्तर भारतीय विकास सेनेने थेट प्रतिक्रिया देत, “ठाकरे बंधू कितीही एकत्र आले तरी मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार,” असा ठाम दावा केला आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “राज ठाकरे, उद्धव ठाकरे, भाजप – कोणीही कितीही मोर्चे काढो वा कार्यक्रम घेओ, उत्तर भारतीय समाज यावेळी अधिक जागरूक झाला आहे. या सर्व नेत्यांनी हिंदू आणि हिंदीविरोधी भूमिका घेतल्या आहेत. उत्तर भारतीय समाज आता संघटित होत असून, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीय उमेदवारच विजयश्री खेचून आणेल आणि आमचाच महापौर बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आकडेवारीवर आमचा दावा ठाम-
शुक्ला यांनी याआधीही आकडेवारी देत महापौरपदाच्या दाव्याचे समर्थन केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईची लोकसंख्या सुमारे २.२० कोटी आहे, त्यात सुमारे १ कोटी मराठी, १ कोटी उत्तर भारतीय आणि उर्वरित इतर राज्यांतील नागरिक आहेत. मराठी मतदार हे विविध पक्षांमध्ये विभागलेले असताना, जर फक्त ३०% उत्तर भारतीय मतदारांनी एकजूट दाखवली, तरी आमचा उमेदवार सहज जिंकू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठीपणावर कुणाची मक्तेदारी नाही –
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे भाजपच्या मराठी मतांवर परिणाम होईल का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मीही मराठी आहे, आशिष शेलारही मराठी आहेत. मग आम्ही कुठे पंजाबी किंवा गुजराती आहोत काय? मराठी माणसांचे मत कुणाच्या हाती गहाण नाही. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला कारण आम्ही काम केले. आजही मराठी व गैरमराठी जनता आमच्या पाठीशी उभी आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राजकीय रंगत वाढणार-
५ जुलैचा मोर्चा आणि त्याभोवतीचं राजकीय वातावरण पाहता, मुंबईतील आगामी महापालिका निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित. ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा, उत्तर भारतीय समाजाचा संघटनात्मक दावा, आणि भाजपचा ‘कामगिरी’वर भर – या तिघांच्या त्रिकोणातून निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.









Comments are closed