India Morning News
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी स्वयंसेवकांशी संवाद साधताना सामाजिक समतेवर जोर दिला. समाजाने आता जातीय भेदभाव सोडून एकात्म आणि समरसतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
व्यक्तीच्या विकासातून राष्ट्रनिर्मिती
संघाचे मुख्य कार्य म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास, असे भागवत म्हणाले. “जेव्हा एक व्यक्ती विकसित होते, तेव्हा तिच्या माध्यमातून कुटुंब, समाज आणि संपूर्ण राष्ट्र घडते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक घराशी संपर्क वाढवण्याचा आग्रह
भागवत यांनी स्पष्ट केले की संघाच्या शाखा ज्या भागात आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाशी संवाद असावा. “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानावर आधारित संघाचे कार्य संपूर्ण समाजामध्ये सकारात्मक पद्धतीने पोहोचत आहे, असे त्यांनी नमूद केले.
सेवा प्रकल्पातून बदलाची दिशा
देशभरात लाखो सेवा प्रकल्प राबवले जात असून, त्यातून समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. संघ आता शताब्दी वर्षात प्रवेश करत असून ‘पंच परिवर्तन’ या विचारधारेनुसार कार्य करत असल्याचे भागवत यांनी सांगितले.
सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित
“आपण असे समाज निर्माण केले पाहिजे, जे जबाबदार, संवेदनशील आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणारे असेल,” असे सांगताना भागवतांनी मंदिर, तलाव, स्मशानभूमी यांसारख्या सार्वजनिक सुविधांवर सर्व समाज घटकांचा समान अधिकार असला पाहिजे, हे ठामपणे अधोरेखित केले.
जातिभेदाच्या पलिकडे जाऊन समरसतेकडे वाटचाल हवी
समाजामध्ये समतेची भावना रुजवणे आणि जातीपातीच्या रेषा मिटवणे हे आजच्या काळाचे खरे कार्य असल्याचे सांगत, भागवतांनी एकात्मतेच्या दिशेने कृती करण्याचे आवाहन केले.









Comments are closed