India Morning News
नागपूर: विरोधी पक्षांनी मतदारयादीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. काही नावे गायब असल्याने आणि काही नावांची पुनरावृत्ती झाल्याने मतदारयादीत गोंधळ निर्माण झाला आहे. या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. यामुळे महाराष्ट्रात राजकीय तणाव वाढला आहे.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर ठाम प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “निवडणूक जाहीर झाली असून सरकार पूर्णपणे तयार आहे. मात्र, गरज पडल्यास बदल करता येतील.” त्यांच्या या विधानामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस, महाविकास आघाडी आणि मनसे नेते मतदारयादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची मागणी करत आहेत. निवडणूक आयोगाशी झालेल्या बैठकीत त्यांची चर्चा अपयशी ठरली.
फडणवीस पुढे म्हणाले, “आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. महायुतीतील तिन्ही पक्ष आपापले निर्णय घेतील. सर्वत्र एकत्र लढलो नाही तरी आमची एकजूट कायम राहील. महाराष्ट्रातील जनता पुन्हा महायुतीला पाठिंबा देईल.”




