India Morning News
मुंबई: शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला.
“उद्धव ठाकरेंच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नव्हता. मी आव्हान दिलं होतं की विकासावर एखादा मुद्दा सापडला तर १००० रुपये देईन. त्यामुळे उद्धव ठाकरेंमुळे माझे १००० रुपये वाचले,” असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.
ठाकरे यांनी सरकारवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “त्यांचं भाषण हे लोकांसाठी नसून स्वगतच आहे. लोक ऐकायलाही उरले नाहीत.”
फडणवीसांनी पुढे ठाकरेंवर आरोप करताना म्हटलं, “ते अतिवृष्टीसारख्या आपत्तीवरही राजकारण करतात. सत्तेत असताना त्यांनी कोणते निर्णय घेतले हे लोकांसमोर सांगावं. आम्ही मात्र आमचं कर्तव्य पार पाडलं.”
यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. “राहुल गांधींना संविधानावर विश्वास नाही. त्यांच्या आजीने आणीबाणी लावून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला होता. गांधी हे ‘सीरियल लायर’ आहेत,” असा आरोप फडणवीसांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे.






Comments are closed