India Morning News
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील शंकरपट गावात रविवारी सायंकाळी साक्षगंधाचा कार्यक्रम संपताच जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला आणि थेट गोळीबार झाला. या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कार्यक्रमानंतर देवा ऊर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ याचा बाल्या हिरामण गुजर याच्याशी वाद झाला. काही क्षणांतच वाद मारहाणीपर्यंत गेला आणि त्यानंतर गोळीबार झाला. या हल्ल्यात देवासोबत तपन पिसाराम एकनाथ, आकाश एकनाथ, मोरेश्वर एकनाथ, सावन एकनाथ, काशिराम एकनाथ आणि दिनेश सनेश्वर यांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
गोळीबारात बाल्या गुजरच्या मांडी आणि छातीवर गोळ्या लागल्या. त्याला तातडीने नागपूर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गोंधळात बाल्याचा भाऊ सुनील गुजर, मुकश मापूर आणि काही पाहुणेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेनंतर आरोपी पसार झाले. मात्र कळमेश्वर पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करून सर्व सात जणांना काही तासांत अटक केली.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या अपहरणप्रकरणातूनच हा हल्ला झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









