India Morning News
– धार्मिक पर्यटनाला मिळणार दिशा
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पाच प्रमुख तीर्थक्षेत्रांना राज्य सरकारकडून ‘ब’ वर्गाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाचा चेहरा-मोहरा बदलणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यानंतर मिळालेल्या या निर्णयाबद्दल जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.
कोणत्या तीर्थक्षेत्रांना मिळाला ‘ब’ वर्ग दर्जा?
जिल्ह्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्गाचा दर्जा मंजूर झाला आहे. त्यामध्ये –
- श्री क्षेत्र हनुमान मंदिर, खडगाव
- श्री भवानी मंदिर, वडोदा (ता. कामठी)
- श्री मुकतेश्वर देवस्थान, भुगाव (ता. कामठी)
- श्री शक्तिमाता भवानी तीर्थक्षेत्र, देवमुंढरी (ता. मौदा)
- श्री क्षेत्र बल्याची पहाडी, निहारवाणी (ता. मौदा)
या पाचही ठिकाणी शासन निधीतून रस्ते, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, पार्किंग, निवास व्यवस्था अशा मूलभूत सुविधांचा विकास होणार आहे.
धार्मिक पर्यटनाला बळ-
या निर्णयामुळे जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला मोठा वेग मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सोयी-सुविधा वाढल्यामुळे या तीर्थक्षेत्रांवर येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल. त्याचा थेट फायदा स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधींमध्ये होणार आहे. हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था, लहान उद्योगधंदे तसेच स्थानिक उत्पादनांना याचा थेट हातभार लागणार आहे.
बावनकुळे यांची प्रतिक्रिया-
महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्याच्या धार्मिक परंपरा अधिक बळकट होतील. भाविकांच्या श्रद्धेला बळ मिळेल आणि नागपूर धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गावोगावी उत्साह-
या निर्णयामुळे तीर्थक्षेत्र असलेल्या गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाविकांसाठी सुविधा उभारल्या गेल्याने स्थानिक लोकांना व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक उन्नतीसोबतच अर्थकारणालाही याचा हातभार लागणार आहे.










Comments are closed