Shopping cart

  • Home
  • News
  • जलप्रलयाचा कहर! ईशान्य भारतात पुरामुळे ३६ जणांचा मृत्यू

जलप्रलयाचा कहर! ईशान्य भारतात पुरामुळे ३६ जणांचा मृत्यू

June 3, 20251 Mins Read
35

India Morning News

Share News:
Share

गुवाहाटी:

ईशान्य भारतातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून लाखो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. अनेक भागांमध्ये अजूनही मदत पोहोचलेली नाही आणि संकट अधिक गडद होत चालले आहे.

आसाममध्ये या संकटाचा सर्वाधिक फटका बसला असून, २२ जिल्ह्यांमधील सुमारे ५.३५ लाख नागरिक पूरग्रस्त झाले आहेत. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १०, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ३ आणि त्रिपुरामध्ये १ जणाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

सिक्कीममधील छातेन येथे लष्करी छावणीत भूस्खलन झाल्याने तिघा जवानांचा मृत्यू झाला असून, ६ जवान अद्याप बेपत्ता आहेत. संरक्षण विभागाकडून शोधकार्य सुरू असून हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, ६५ महसूल मंडळांतील १२५४ गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. श्रीभूमी जिल्ह्यात सर्वाधिक १,९४,१७२ लोक बाधित झाले असून, त्यानंतर कछार जिल्ह्यात ७७,९६१ आणि नागावमध्ये ६७,८८० लोक प्रभावित झाले आहेत.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी लखीमपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन नागरिकांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. “राज्य शासन पूर्ण क्षमतेने मदतीसाठी तत्पर आहे,” असं ते म्हणाले.

दरम्यान, हवामान विभागाने काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share