India Morning News
मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सुरू असलेल्या मोफत रेशन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे केंद्र सरकारच्या तपासात उघड झाले आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेली ही योजना अनेक अपात्र लाभार्थी वापरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्राने थेट कारवाई करत तब्बल 2.25 कोटी अपात्र व्यक्तींची नावे रेशन यादीतून वगळली.
तपासात चारचाकी वाहनधारक, उच्च उत्पन्न गटातील नागरिक आणि विविध कंपन्यांचे संचालक सुद्धा मोफत रेशन घेत असल्याचे आढळले. याशिवाय मृत व्यक्तींची नावेही वर्षानुवर्षे यादीत कायम राहिल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने आधार माहिती, उत्पन्न कागदपत्रे, वाहन नोंदणी आणि कुटुंबीयांचा डेटा यांची सखोल छाननी केली. त्यातून मिळालेल्या अपात्र नावांची यादी राज्यांना पाठवून संबंधित लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले. पुढील काळातही अशी पडताळणी सातत्याने सुरु राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या देशातील 81 कोटींहून अधिक नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना 35 किलो मोफत धान्य आणि प्राधान्य श्रेणीतील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदूळ किंवा गहू पूर्ववत मिळत राहणार आहे.
गरिबांच्या हक्काचे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.






