India Morning News
– लाडक्या बाप्पाच्या जयघोषाने वातावरण चैतन्यमय
नागपूर : ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘ॐ नमो गणपतये नमः’ च्या गजरात शहर गणेशभक्तांनी भक्तीभावाने न्हाऊन निघाले. खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत आयोजित ‘जागर भक्तीचा’ या भव्य कार्यक्रमात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात गणपती अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचा सामूहिक पठण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
एका स्वरात गुंजणाऱ्या “त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि” या मंत्रोच्चारांनी परिसर दुमदुमून गेला. या सामूहिक आवर्तनात हजारोंच्या संख्येने नागपूरकरांनी, लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी, खासदार सांस्कृतिक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय शारीरिक स्वास्थ्य विभाग प्रमुख मनीषा संत, गायत्री औद्योगिक पतसंस्थेच्या संचालिका विजयाताई भुसारी, टेकडी गणेश मंदिराचे विश्वस्त दिलीपजी शहाकार, भागवताचार्य मोहिनी देवपुजारी आणि कराटे कोच धनश्री जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचे स्वागत योगिनी कोमेजवार, मायाताई हाडे, शाम निसाळ, नीरजा पाटील आणि नलिनी वंजारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
भक्तीमय वातावरणात सुरू झालेल्या या सोहळ्याची सुरुवात सहज योग संस्थेच्या योगाभ्यास सत्राने झाली. या सत्रात योगतज्ज्ञांनी मानवाच्या सूक्ष्म तंत्रावर योगाचा कसा प्रभाव पडतो याचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
गणपती अथर्वशीर्षाच्या आवर्तनासोबत साधकांच्या चेहऱ्यावर दिसणारी आनंदाची झळाळी, ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भारलेले वातावरण आणि सामूहिक अध्यात्माचा अद्भुत संगम या सर्वामुळे ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रम खऱ्या अर्थाने भक्ती, शांती आणि एकात्मतेचा अनुभव देणारा ठरला.







