India Morning News
चोरलेले पाच मोबाईल हस्तगत
नागपूर – रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत लोहमार्ग पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघडकीस आला.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दोन मोबाईल चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पहिल्या घटनेत बिहारमधील प्रवासी गोलुकुमार रॉय यांचा मोबाईल प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून चोरीस गेला, तर दुसऱ्या प्रकरणात मध्य प्रदेशातील रजीत अहिरवार यांचा मोबाईल प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून गायब झाला होता.
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये सापडलेल्या फुटेजच्या मदतीने तीन संशयितांची ओळख पटवण्यात आली आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं पंकज रनगीरे, रितेश ऊर्फ मोनू रनगीरे (मध्य प्रदेश), आणि जी. शंकर कणेशन (तामिळनाडू) अशी आहेत.
या आरोपींकडून पाच मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू ठेवला असून, या टोळीचा संबंध आणखी मोठ्या चोरट्यांच्या जाळ्याशी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.










Comments are closed