India Morning News
मुंबई : रविवारी पारंपरिक उत्साहात घराघरांत ज्येष्ठा–कनिष्ठा गौराईंचे स्वागत करण्यात आले. “सोन्याच्या पावलांनी गौराई आली” या गजरात माहेरवाशिणी देवींचे आगमन झाले आणि घराघरांत सणासुदीचे चैतन्य फुलले.
रविवारी अनुराधा नक्षत्रावर सकाळपासून सायंकाळी ५.२७ वाजेपर्यंत गौराई आवाहनाचा मुहूर्त लाभला होता. त्यामुळे महिलांनी आपल्या सोयीप्रमाणे देवीचे आवाहन, सजावट आणि पूजाअर्चा केली. पारंपरिक साड्या, दागिने आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या माहेरवाशिणींच्या रूपातील गौराईंचे आगमन घराघरांत उत्साहवर्धक ठरले.
अनेकांनी परंपरेनुसार नव्या साड्या खरेदी करून गौराईंना नेसविल्या. कुठे पितळी व शाडूच्या मुखवट्यांना, तर कुठे खड्याच्या गौराईंची पूजा करून देवीचे स्वागत करण्यात आले. देवींच्या आगमनानंतर घराघरांत फराळाचे पदार्थ मांडले गेले तसेच फुलांच्या माळा व रोषणाईने घरांची शोभा वाढवली गेली.
गौराई आगमनानंतर सोमवारी होणाऱ्या पूजनाची लगबग महिलांकडून सुरू झाली आहे. हळदी-कुंकूच्या खिरापतींपासून ते नैवेद्याच्या तयारीपर्यंत घराघरांत आनंदी गडबड सुरू झाली.
रविवारची सुट्टी असल्याने अनेकांनी गौराई आवाहनानंतर संध्याकाळी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेतले आणि विविध देखावे अनुभवले. घराघरांत देवीचे स्वागत, भक्तिमय सजावट आणि उत्साही वातावरणामुळे शहरात सणासुदीचा माहोल अनुभवायला मिळत आहे.









Comments are closed