India Morning News
नागपूर – देशातील बुलियन बाजारात सलग चौथ्या दिवशी सोनं व चांदीच्या किंमती घसरल्याने व्यापारी आणि ग्राहक दोघांमध्येही खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचा निर्णय पुढे ढकलल्याने डॉलर मजबूत झाला असून, त्याचा थेट परिणाम भारतातील मौल्यवान धातूंच्या बाजारावर झाला आहे.
आज २४ कॅरेट सोन्याची किंमत घसरून ₹१,२१,३६६ प्रति १० ग्रॅम झाली. कालच्या तुलनेत हा जवळपास ₹१,५५८ रुपयांचा मोठा उतार आहे. तर चांदीनेही जोरदार घसरण नोंदवली असून किंमत ₹१,५१,८५० प्रति किलोपर्यंत खाली आली, म्हणजेच एका दिवसात तब्बल ₹३,०८३ रुपयांची पडझड झाली.
जागतिक बाजारातही अस्थिरता कायम आहे. न्यू यॉर्कमध्ये सोन्याच्या दरात $६६ ची घट झाली असून त्याचे प्रतिबिंब थेट मुंबईच्या व्यापारावर दिसून आले. ऑल-टाइम हायपासून सोनं तब्बल ₹९,५०८ रुपयांनी आणि चांदी तब्बल ₹२६,२५० रुपयांनी खाली आली आहे.
IBJA कडून जाहीर झालेल्या दुपार व संध्याकाळच्या दरानुसार २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सर्वच प्रकारातील सोन्याने घसरण दाखवली आहे. त्यामुळे ज्वेलर्स आणि गुंतवणूकदार पुढील किंमतचढ-उताराकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
गेल्या वर्षभरातील मोठ्या तेजीच्या पार्श्वभूमीवर सध्याची घसरण गुंतवणूकदारांसाठी मिश्र संकेत देणारी ठरत आहे.








