India Morning News
गोंदिया – तिरोडा तालुक्यातील इंदोरा–निमगाव परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय रुची देवानंद पारधी या बालिकेचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, रुची आपल्या वडिलांसोबत शेतात गेली होती. वडील कामात व्यस्त असताना ती थोड्या अंतरावर उभी होती. त्याचवेळी झुडपातून बाहेर पडलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घालत हल्ला केला. प्राण्याने तिला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मुलीच्या आर्त किंकाळ्या ऐकताच तिचे वडील व इतर कामगार धावत येताच बिबट्या पळून जंगलात परतला. गंभीर जखमी अवस्थेतील रुचीला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गोंदियातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही रात्री आठच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप आहे. परिसरात वाढलेल्या बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे आणि संबंधित प्राण्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. इंदोरा–निमगाव परिसरात भीतीचे सावट कायम असून, गावकरी सुरक्षेसाठी कडक उपाय योजना करण्याचा आग्रह धरत आहेत.







