India Morning News
नागपूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचे पीक नाश झाले आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये तब्बल 70 लाख एकर क्षेत्रातील पीक खराब झाले असून, अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
2,215 कोटींचा थेट निधी-
मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार, 2,215 कोटी रुपये 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील. विदर्भ आणि मराठवाडा या भागांतील शेतकऱ्यांचे नुकसान सर्वाधिक झाले असून, नांदेड, बीड, धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. काही भागांमध्ये अजूनही पाणी असल्याने पंचनामे प्रलंबित आहेत; पाणी ओसरल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना मदत वितरीत केली जाईल.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा पावसाने सर्वाधिक झोडपून निघाले आहेत. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील गावांनाही मोठा तडाखा बसला असून, 32 लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
1,339 कोटींची स्वतंत्र मदत-
याशिवाय, जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी 1,339 कोटी रुपयांची स्वतंत्र मदत जाहीर करण्यात आली आहे. ही रक्कम पंचनाम्यांच्या आधारे वितरीत केली जाईल आणि यात मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी लाभार्थी असतील.
बीड आणि धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती अद्यापही कायम असून, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन्स सुरु आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्त गावांतील नागरिकांची सुटका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यासंदर्भात माहिती देत बचावकार्याला गती दिल्याचे सांगितले आहे.या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.











Comments are closed