India Morning News
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरी करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले की, “दर निवडणुकीत आमच्याकडे एकच रिपोर्ट येत होता — मतदार यादीतून विरोधकांचे, दलितांचे, आदिवासींचे आणि अल्पसंख्याकांचे नावे काढली जात आहेत. यावेळी तर हे पुराव्यासकट समोर आले आहे. ही एक नियोजित मतचोरी आहे.”
कर्नाटकातून उघड झालेला प्रकार
राहुल गांधींनी उघड केले की, कर्नाटकातील आळंद मतदारसंघात हा प्रकार धडकला. एका BLO च्या नातेवाईकाचं नाव यादीतून गायब झाल्याने चौकशी झाली आणि त्यातून ६ हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावे पद्धतशीररीत्या वगळल्याचं आढळलं.
यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील मोबाईल नंबर वापरले गेले, तर अर्ज दाखल करणाऱ्यांचे IP अॅड्रेसही संशयास्पद होते. “गोदाबाई नावाच्या एका महिलेच्या नावाने १२ वेगवेगळ्या मतदारांची नावे डिलिट केली गेली, आणि त्या महिलेला याची कल्पनाही नव्हती,” असं गांधी म्हणाले.
नागरिकांना स्टेजवर बोलावलं
या संदर्भात राहुल गांधींनी सूर्यकांत नावाच्या व्यक्तीला स्टेजवर बोलावलं. त्यांच्या नावावरून फक्त १४ मिनिटांत १२ नावे वगळली गेली होती. पण सूर्यकांत यांनी मी असा कोणताही अर्ज केला नाही, ही लोक मला माहितसुद्धा नाहीत, असं स्पष्ट केलं. काही अर्ज तर पहाटे ४ वाजता दाखल झाले होते, हे पाहून आयोगाची भूमिका संशयास्पद वाटते, असा गांधींचा सवाल होता.
सीआयडीच्या पत्रांकडे आयोगाचं दुर्लक्ष
राहुल गांधींनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी कर्नाटक सीआयडी करत आहे. त्यांनी आयोगाला १८ पत्रं पाठवली आहेत. पण त्यांना एकालाही उत्तर मिळालेलं नाही. “मोबाईल नंबर कोणाचे आहेत, ओटीपी कुठून जनरेट झाले, लोकेशन काय आहे — याची माहिती आयोगाने द्यायलाच हवी होती. पण आजवर आयोग मौन बाळगत आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला











Comments are closed