India Morning News
पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबईत जोरदार पाऊस; पंचनाम्यांचे आदेश, एनडीआरएफ तैनात
मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर परिसरात अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले असून, मुख्य सचिव आणि राज्य आपत्ती निवारण कक्षाशी सतत संपर्कात आहेत.
पुणे जिल्ह्यात हाहाकार
पुणे जिल्ह्यात दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., तर इंदापूर येथे 63.25 मि.मी. पावसाची नोंद झाली. बारामतीत 25 घरांची अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या, त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे पुरात अडकलेल्या 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
फलटणमध्ये 163.5 मि.मी. पाऊस
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये 163.5 मि.मी. पावसाने कहर केला. दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना एनडीआरएफच्या चमूने सुरक्षित स्थळी हलवले असून, त्यांना निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोलापूरात पूरस्थिती
सोलापूर जिल्ह्यात 67.75 मि.मी. पावसाची नोंद झाली. माळशिरस तालुक्यात पुरात अडकलेल्या 6 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, तर पंढरपूर येथे भीमा नदीच्या पात्रात अडकलेल्या 3 जणांचे बचावकार्य सुरू आहे.
*रायगडमध्ये वीज पडून मृत्यू*
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महाड ते रायगड किल्ला रस्ता बंद करण्यात आला आहे. येथे वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुंबई रेड अलर्ट
मुंबईत 24 तासांत 135.4 मि.मी. पावसाने धडक दिली. शहरात 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या, 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या, तर 5 ठिकाणी भिंत पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, प्राणहानी झालेली नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफच्या 5 पथकांसह सर्व यंत्रणा सज्ज आहेत. हवामान खात्याने पुढील 24 तासांत वादळी वारा आणि विजांसह पावसाचा इशारा दिला आहे.
*प्रशासन सतर्क*
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तत्काळ मदत पुरवली जात आहे.







Comments are closed