India Morning News
मुंबई :
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून फोन करून दिलेल्या जीवघेण्या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नवनीत राणा यांना मिळालेल्या कॉलमध्ये अपमानास्पद आणि आक्रमक भाषा वापरून धमकी देण्यात आली. फोनवरून एकाने म्हणले, “हिंदू शेरनी, तुझा वेळ आता थोडाच शिल्लक आहे. तुला संपवून टाकू, ना सिंदूर राहील ना त्याला लावणारी.” नवनीत राणा यांच्या मते, अशीच धमकी त्यांचे पती रवी राणा यांनाही फोनद्वारे देण्यात आली.
पोलिसांनी प्राथमिक तपासात हा कॉल पाकिस्तानातून आल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यामुळे हा तपास केवळ स्थानिक नाही, तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा ठरण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना या प्रकरणात केंद्रातील गुप्तचर संस्थांची मदत घ्यावी लागू शकते. विशेष म्हणजे, याआधीही नवनीत राणा यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानातून धमक्या मिळाल्या होत्या.
वक्तव्यामुळे वाद, आणि त्यानंतर धमकी-
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नवनीत राणा यांनी पाकिस्तानविरोधात केलेल्या कठोर वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. “आम्ही घरात घुसून मारलं, तुमचं थडगं तयार आहे. दिल्लीच्या गादीवर मोदीसाहेब बसलेत, लवकरच सगळे छोटे पाकिस्तान संपतील,” असं त्यांनी एका भाषणात म्हटले होते. हे भाषण समोर आल्यानंतरच धमक्यांचे सत्र सुरू झाले असल्याचा अंदाज आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर-
या घटनेनंतर नवनीत राणा यांच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.








Comments are closed