India Morning News
नवी दिल्ली – जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सजग झाल्या असून, अटकेत असलेल्या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तहव्वुर हुसेन राणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली असता, त्याने 26/11 मुंबई हल्ल्याविषयी खळबळजनक माहिती दिली आहे.
चौकशीदरम्यान राणाने दावा केला की, 26/11 च्या भीषण हल्ल्यात त्याचा कोणताही सहभाग नव्हता. उलट, या कटामागे त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली याचा हात असल्याचे राणाने स्पष्ट केले. तसेच, हल्ल्याच्या नियोजनात स्वतःचा कोणताही सहभाग नसल्याचा पुनरुच्चारही त्याने केला.
केरळमध्येही गेल्याचा खुलासा
तपास यंत्रणांनी विचारणा केली असता राणाने सांगितले की, दिल्ली आणि मुंबईसोबतच तो केरळलाही गेला होता. केरळमध्ये त्याने काही परिचितांना भेट दिल्याचे त्याचे म्हणणे आहे. या व्यक्तींची नावे आणि पत्तेही त्याने अधिकाऱ्यांना दिले असून, या माहितेची सध्या पडताळणी सुरू आहे. लवकरच एक पथक केरळकडे रवाना होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण
तहव्वुर राणाला अमेरिकेतील लॉस एंजेलिसहून विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाने अमेरिकन न्यायालयात अनेक प्रयत्न केले, मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण यशस्वी झाले.
लष्कर-ए-तैयबाशी संबंधाचा आरोप
राणावर 26/11 हल्ल्याच्या कटात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसोबत मिळून काम केल्याचा गंभीर आरोप आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरिमन हाऊस या ठिकाणी झालेल्या दहशतवादी कारवायांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अनेक वर्षांपासून राणाविरुद्ध पुरावे गोळा करत होती आणि आता त्याच्यावरील चौकशीला वेग आला आहे.






Comments are closed