India Morning News
आदमपूर (पंजाब) – पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, तर त्याचा शेवट ‘विनाश’ असेल, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर जवानांना संबोधित करत होते.
ते म्हणाले, “पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा झाला आहे. हे भारताचं सामर्थ्य आहे – जे शत्रूंना त्यांच्या घरात जाऊन धडा शिकवतो.
भारत न्यूक्लिअर धमकीला घाबरत नाही-
मोदी म्हणाले, “आपल्या सैन्याने दहशतवाद्यांना चिरडून टाकलं आहे आणि पाकिस्तानची न्यूक्लिअर धमकी ही केवळ एक ‘गाजरगप्पा’ आहे, हे जगाला दाखवून दिलं आहे. भारताचं संरक्षण यंत्रणा इतकी मजबूत आहे की, शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र उड्डाण घेण्याआधीच नष्ट होतात.
‘ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या निर्णायकतेचा प्रतीक-
हे ऑपरेशन भारताच्या धोरण, हेतू आणि निर्णायकतेचं प्रतीक आहे, असं सांगून मोदींनी जवानांचं विशेष कौतुक केलं. “तुम्ही केवळ मिशन पूर्ण केलं नाही, तर शत्रूच्या हेतूंनाही पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. यामुळे संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे.
तीन तत्वं, भारताची नवी सुरक्षा भूमिका-
पंतप्रधान मोदींनी भारताच्या नव्या सुरक्षा धोरणाचे तीन स्पष्ट तत्व मांडले:
हल्ला झाला, तर उत्तर ‘आपल्या वेळेनुसार, आपल्या पद्धतीने’ दिलं जाईल.
भारत कोणतीही अण्वस्त्र धमकी सहन करणार नाही.
दहशतवाद्यांना आश्रय देणारे आणि दहशतवादी – दोघांनाही एकाच नजरेने पाहिलं जाईल.
शिवशक्तीच्या या भूमीतून वीरांना सलाम-
“आज मी या वीरांच्या भूमीतून भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि BSF च्या सर्व जवानांना सलाम करतो. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या शौर्यामुळे, ऑपरेशन सिंदूर जगभर गाजलं आहे,” असं मोदींनी अभिमानाने सांगितलं.










Comments are closed