India Morning News
रेतीचे अवजड वाहने विनाक्रमांकाचे धावतात; प्रशासनाचे दुर्लक्ष
तुमसर (२१ मे, भंडारा) : तालुक्यातील बाह्मणी येथील घाटातून वाळूचा उपसा करून उमरवाडा घाटात नेण्याची परवानगी महसूल प्रशासनाने दिली आहे. बाह्मणी वाळू घाटातून केवळ उपसा करण्याची परवानगी असताना काही ट्रॅक्टर चालकांकडून नदीपात्रात लोडर घालून मर्यादेपेक्षा अधिक वाळू उत्खनन व इतरत्र वाहतूक करीत आहे. याकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
बाह्मणी येथून वाळूचा उपसा करून उमरवाडा येथील शासकीय डेपोवर नेण्यासाठी महसूल प्रशासनाने परवानगी दिली. उमरवाडा ते बाह्मणी हे केवळ पाच किलोमीटर अंतर असून दोन्ही नदीचे पात्र हे वैनगंगेचे आहेत. उमरवाडा व बाह्मणी येथील नदीचे पात्र विस्तृत आहे. या नदीपात्रात वाळूचा मोठा साठा उपलब्ध आहे. मात्र, उमरवाडा येथे वाळूसाठा असूनसुद्धा बाह्मणी घाटातून वाळू उपसा केला जात आहे.
बाह्मणी येथील वाळू घाटातून नियमबाह्य वाळूची विक्री ट्रॅक्टर चालकांकडून केली जात असल्याची माहिती आहे. उमरवाडा येथे वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टरला जीपीएस प्रणालीचा वापर आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसून नदीपात्रात सीमांकनाच्या बाहेर वाळूचा उपसा होत आहे. त्यामुळे स्थानिकांना येथे वाळू मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या निलंबन होऊन सुद्धा काही घाटातून अवैधरित्या वाळू उपसा खुलेआम सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांचा याकडे दुर्लक्ष होत आहे.
अवजड वाहने विनाक्रमांकाची धावत असताना याकडे मात्र, परिवहन विभागाकडून लक्ष दिले जात नाही. अवजड वाहने दिवसभरात मुख्य चौकातून धावतात. विशेष म्हणजे यातील बहुतांश वाहनांना नंबरच नसल्याचे समोर आले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
पासिंगशिवाय वाहने रस्त्यावर कशी?
कायद्यानुसार कुठलेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनावर परिवहन विभागाकडून नंबर दिला जातो. तो नंबर वाहनाच्या नंबर प्लेटवर लिहूनच सदरील वाहन रस्त्यावर धावेल असा शासनाचा नियम आहे. परंतु काही ठरावीक वाहनांवर मात्र शासनाचा हा नियम लागू होत नाही का? अशा वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.







Comments are closed