India Morning News
पुणे: पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज सकाळी पाटील इस्टेट परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. ड्रेनेज लाईन बदल, शौचालय स्वच्छता व दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि नवीन शौचालयांच्या गरजेवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. स्थानिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
आयुक्तांनी तात्काळ ड्रेनेज आणि शौचालय दुरुस्तीच्या कामाचे आदेश दिले. आरोग्य विभागाला शौचालय स्वच्छतेबाबत काटेकोर सूचना देण्यात आल्या. स्थानिकांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली असता, आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपायुक्त श्री. संदीप कदम (घनकचरा व्यवस्थापन), उपायुक्त श्री. अरविंद माळी (परिमंडळ २), सहायक आयुक्त श्री. तिमय्या जागले (घोले रोड क्षेत्रीय कार्यालय), स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
यानंतर महानगरपालिकेत पाटील इस्टेट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात (एस.आर.ए.) बैठक घेण्यात आली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सीईओ श्री. सतीश कुमार खडके, शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे, सीओईपीचे श्री. बिराजदार तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. आयुक्तांनी एस.आर.ए. प्रकल्ने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पाटील इस्टेटमधील नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी महानगरपालिकेचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. स्थानिकांनी आयुक्तांच्या तातडीच्या कारवाईचे आणि सहभागी दृष्टिकोनाचे स्वागत केले आहे. या उपाययोजनांमुळे परिसरातील राहणीमान सुधारण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.








Comments are closed