India Morning News
गुन्हेगारीविरोधात ठोस कारवाईची गरज
बीड – जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. भाईगिरी, राजकीय वरदहस्त, आणि निर्भयपणे वावरणारे गुंडगट यामुळे बीडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी “बीडमध्येही लष्कराच्या धर्तीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा,” अशी जोरदार मागणी केली असून त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हेगारीचं वाढतं साम्राज्य-
गेल्या काही वर्षांत बीड जिल्हा हा गुन्हेगारीचं केंद्रबिंदू बनत चालला आहे. गावागावात तरुणांमध्ये भाईगिरीचं आकर्षण निर्माण झालं असून त्यांना स्थानिक राजकीय आशीर्वाद मिळतो, असा आरोप नागरिक करत आहेत.
नुकतीच एक घटना समोर आली, ज्यामध्ये अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना केवळ गुन्हेगारी नव्हे तर बीडमधील सामाजिक ढासळलेपणाचं दर्शन घडवत होती. 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. ही हत्या दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानेच झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली, तरी अजूनही मुख्य सूत्रधार मोकाटच आहेत, असा लोकांचा आरोप आहे.
दामानियांचा संतप्त सूर-
अंजली दामानिया म्हणाल्या, “सीमेपलीकडे जसं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं, तशीच कठोर कारवाई बीडमध्ये गुन्हेगारांवरही करायला हवी. परळीसारखा भाग आता दहशतीचं केंद्र बनला आहे. केवळ १८ वर्षांचे तरुण रस्त्यावर लोकांना मारहाण करत असतील, तर ही गोष्ट गंभीर आहे.”
त्यांच्या या विधानाला समाजमाध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी त्यांचे समर्थन करत कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी ही तुलना अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं मत मांडलं आहे. बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या न राहता, सामाजिक धोकाही बनली आहे. अशा स्थितीत अंजली दामानियांनी लावलेला आवाज हे लोकांच्या मनातील अस्वस्थतेचं प्रतिबिंब आहे. आता प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.









Comments are closed