India Morning News
खासदार धानोरकरांकडून ‘हिरकणी कक्ष’ आणि मोफत शववाहिकेची मागणी
शेतकऱ्यांची गोठविलेली बँक खाती तात्काळ सुरु करा
चंद्रपूर :-
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, आगामी जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज अनेक महत्त्वपूर्ण आणि लोकहितकारी मागण्या व सूचना जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. यामध्ये पोलीस ठाण्यात महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’, मोफत शववाहिका सेवा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि आरोग्य सेवांचा विस्तार यावर विशेष भर देण्यात आला आहे.
आज पालकमंत्री अशोक उईके यांचा अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी खासदार नामदेव किरसान, विधान सभेचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगाडे, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विजय गौंडा, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांची उपस्थिती होती.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख मागण्यामध्ये गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची अपेक्षा होती. याच अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपली जुनी कर्जे भरली नाहीत. परंतु, शासनाने या खात्यांवर निर्बंध घालत ती गोठवली, ज्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या नवीन कर्ज घेण्याच्या क्षमतेवर झाला आहे. सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर शेतीमालासाठी तातडीने पैशांची गरज असताना, गोठवलेल्या खात्यांमुळे त्यांना कॉप लोन किंवा इतर कोणत्याही प्रकारची नवीन कर्जे मिळत नाहीत. त्यामुळे तात्काळ गोठवलेले खाती पुन्हा पूर्ववत सुरु करण्याची मागणी यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः, लहान मुलांच्या मातांना पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी यावे लागते तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांच्या गरजा, विशेषतः स्तनपानाची सोय उपलब्ध नसणे ही एक मोठी समस्या असते. या कक्षांमध्ये स्तनपानासाठी सुरक्षित आणि खाजगी जागा उपलब्ध झाल्यास, लहान मुलांच्या मातांना मोठा दिलासा मिळेल आणि त्या अधिक निवांतपणे व सुरक्षित वातावरणात आपली तक्रार नोंदवू शकतील. यामुळे महिलांना त्वरित मदत आणि सुरक्षित वातावरण मिळेल. तसेच पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करण्यास आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पोलीस ठाण्यांच्या शेजारीच निवासस्थानांची व्यवस्था करण्यास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार महोदयांनी केली आहे. तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या सुसज्ज आणि सुबक बनवण्यासाठी निधीची तरतूद करण्याची सूचना त्यांनी केली आहे. तसेच उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयांमध्ये, विशेषतः चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात, मृत पावलेल्या रुग्णांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्याच्या वार्षिक योजनेतून मोफत शववाहिका खरेदी करून उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे. अनेकदा अशा परिस्थितीत कुटुंबीयांना मृतदेहाची घरी ने-आण करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही एक अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक जबाबदारीची बाब असून, यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना आर्थिक भार सोसावा लागणार नाही.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे की, जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ मध्ये या सर्व लोकहितकारी मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतील, असे त्यांनी नमूद केले.









Comments are closed