India Morning News
आळंदी: शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये पुन्हा एकजूट होणार का? या चर्चेला सध्या महाराष्ट्रात जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत मिश्कील उत्तर देत चर्चेला वेगळीच रंगत दिली.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जन्मदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आळंदीत आले होते. त्यांनी संत माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर माउलींनी समाजाला आध्यात्मिक दिशा दिली आणि त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांपर्यंत पोहचवणं हीच खरी सेवा आहे.
यावेळी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवरही त्यांनी भाष्य करत, “पाकिस्तान कायमच दहशतवादाला खतपाणी घालतो. मात्र आता भारत मागे हटणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश ठाम भूमिका घेत आहे आणि राज्यस्तरावरही आम्ही तयारी करत आहोत,” असं स्पष्ट केलं.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील पुन्हा संभाव्य एकजुटीवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर फडणवीस म्हणाले, “हे प्रश्न मला का विचारताय? सुप्रिया सुळे किंवा अजितदादांना विचारा. मी का ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ होऊ?” असं म्हणत ते हसत निघून गेले.या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला नवी दिशा मिळाली आहे.






Comments are closed