India Morning News
ऑस्ट्रेलियाच्या लोवी इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताने तिसरे स्थान मिळवत आशियातील ‘प्रमुख शक्ती’ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. या अहवालात आशियातील 27 देशांचा लष्करी, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक प्रभाव आणि भविष्यातील क्षमता यांच्या आधारे अभ्यास करण्यात आला.
इंडेक्सनुसार चीनचा प्रभाव वाढत असला तरी भारताची प्रगती अधिक स्थिर आणि बहुआयामी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे पाकिस्तानची कामगिरी घसरत असून तो 16व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अमेरिका पहिल्या क्रमांकावर कायम असली तरी तिच्या प्रभावात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. 2018 मध्ये इंडेक्स सुरू झाल्यापासून अमेरिकेला यंदा सर्वात कमी गुण मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. कठोर धोरण, आशियातील बदलते संबंध आणि चीनचा विस्तारता प्रभाव ही घटती शक्तीची प्रमुख कारणे म्हणून पाहिली जात आहेत.
भारताच्या गुणांमध्ये झालेली वाढ ही आर्थिक प्रगती, संरक्षणक्षेत्रातील वाढलेली क्षमता आणि धोरणात्मक विस्तारामुळे झाल्याचे विश्लेषणात नमूद आहे. मात्र, भारताने राजनैतिक व आर्थिक प्रभाव आणखी वाढवणे आवश्यक असल्याचे टिप्पणी अहवालात केली आहे.
एकूण इंडेक्स सूचित करतो की आशियातील शक्ती-संतुलन वेगाने बदलत असून भारत या बदलाच्या मध्यवर्ती भूमिकेत उदयास येत आहे.




