India Morning News
नागपूर :२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळीच आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे त्यांच्या मागचे हात हे वेगळे नसतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने हीच भूमिका अधिकृतपणे स्वीकारली आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणानंतर नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मोदींनी मांडलेल्या ‘नवीन वास्तव’ (New Normal) बाबत सविस्तर माहिती दिली.
दहशतवादावर ठाम भूमिका, पाकिस्तानला इशारा
फडणवीस म्हणाले, “आता भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही. अशा कोणत्याही कृतीला थेट भारतावर हल्ला समजले जाईल आणि त्यास तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं जाईल.” तसेच त्यांनी स्पष्ट केले की, ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ किंवा अणुशक्तीच्या नावाखाली दबाव आणण्याचे प्रकार भारत सहन करणार नाही.
दहशतवादी कारवाया आणि त्यांना पाठीशी घालणारे पाकिस्तान सरकार यांच्यात फरक करत बसण्याचा कालावधी आता गेला. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आता अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे, असे फडणवीस म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरचं यश आणि भारतीय लष्कराचं कौतुक
फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवेदनातील ऑपरेशन सिंदूर विषयीचा उल्लेख करताना सांगितले की, भारताने आपल्या सामर्थ्याचं भान ठेवून संयमाने आणि अचूकतेने ही कारवाई पार पाडली. “या ऑपरेशनमुळे पाकिस्तानला इतका धक्का बसला की त्यांना तातडीने शस्त्रसंधीची मागणी करावी लागली,” अशी माहिती त्यांनी दिली.
“भारतीय लष्कराच्या धाडसाचे आणि अचूकतेचे मनापासून अभिनंदन करतो. मोदींच्या निर्णायक नेतृत्वामुळे भारत आता केवळ संरक्षणात्मक नव्हे, तर आघाडीवर चालणारी भूमिका घेत आहे,” असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी यावेळी काढले.
पाकव्याप्त काश्मीरच आता चर्चेचा विषय–
या संदर्भात फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले की, आता फक्त पाकव्याप्त काश्मीरच चर्चेचा विषय राहील. भारताने आज जागतिक समुदायासमोर आपला दृष्टिकोन ठामपणे मांडला आहे.








Comments are closed