India Morning News
– न्यायालयाने दिला थरारक दिलासा,खोट्या खटल्यात ४३ वर्षांचा अन्याय
वॉशिंग्टन : अन्याय, संयम आणि अखेर मिळालेला न्याय — ही कहाणी आहे भारतीय वंशाच्या सुब्रमण्यम ‘सुबू’ वेदम यांची. अमेरिकेत खोट्या खून प्रकरणात निर्दोष असूनही तब्बल ४३ वर्षे तुरुंगात राहिलेल्या वेदम यांची अखेर सुटका झाली, पण स्वातंत्र्याचा श्वास घेण्याआधीच त्यांच्यावर भारतात हद्दपारीचा आदेश निघाला. मात्र, अमेरिकन न्यायालयाने हा आदेश तात्पुरता स्थगित करत त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
१९८० मध्ये पेनसिल्व्हेनियात १९ वर्षीय थॉमस किन्सरच्या खुनाचा आरोप वेदम यांच्यावर ठेवण्यात आला. कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी त्यांना आरोपी ठरवले कारण ते किन्सरसोबत शेवटचे दिसले होते. १९८३ आणि १९८८ मध्ये त्यांना पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
वेदम यांनी आपले निर्दोषत्व कायम ठेवले. त्यांच्या वकिलांनी असा दावा केला की संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता आणि अभियोक्त्यांनी एफबीआयचा महत्त्वाचा अहवाल लपवला होता. या अहवालात खुनात वापरलेल्या गोळीचा प्रकार वेगळा असल्याचे नमूद होते, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा निकाल उलटू शकला असता.
चार दशकांनंतर न्याय मिळाला
२०२५ मध्ये सेंटर काउंटी न्यायाधीशांनी वेदम यांची शिक्षा रद्द केली. त्यांनी नमूद केले की, “जर एफबीआयचा अहवाल आधी सादर झाला असता, तर ज्युरी वेगळा निर्णय घेतला असता.” त्यामुळे सर्व आरोप मागे घेण्यात आले आणि वेदम यांची सुटका झाली.
सुटकेनंतर नवे संकट : ICE ची कारवाई
सुटकेनंतर लगेचच यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. १९८० मधील “लेगसी डिपोर्टेशन ऑर्डर” दाखवत भारतामध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
वकिलांची याचिका आणि न्यायालयाचा दिलासा
वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल करून हद्दपारी थांबवण्याची मागणी केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की ४३ वर्षांचा चुकीचा तुरुंगवास आणि पुनर्वसनाचा विचार करता त्यांना डिपोर्ट करणे अन्यायकारक आहे.
ऑक्टोबरच्या अखेरीस इमिग्रेशन न्यायाधीशांनी त्यांची हद्दपारी तात्पुरती थांबवली, आणि इमिग्रेशन अपील ब्युरोचा अंतिम निर्णय येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.
कुटुंबाची भावना : “आता तरी न्याय मिळावा”
वेदम यांच्या बहिणीने भावनिक शब्दांत म्हटले, “चार दशकांचा तुरुंगवास आमच्या आयुष्याचा काळा अध्याय होता. आता आम्हाला फक्त एकच इच्छा सुबूला कायमस्वरूपी स्वातंत्र्य मिळावे.





