India Morning News
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अखेर २० दिवसांपासून त्यांच्या ताब्यात असलेल्या बीएसएफच्या जवानाला परत पाठवले. कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ हे सीमेलगत शेतकऱ्यांना मदत करत असताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. तेव्हापासून पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते.
बीएसएफच्या अधिकृत निवेदनानुसार, शॉ यांना आज सकाळी १०:३० वाजता अटारी-वाघा सीमेवर संयुक्त चौकीत भारताच्या स्वाधीन करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पहलगामच्या हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या कारवाईत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला होता.
सीमेवरून परत पाठवला पाकिस्तानी जवान
भारतानेही शांततेचा संदेश देत राजस्थानातील सीमेजवळ अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी रेंजरला आजच पाकिस्तानकडे सुपूर्त केले. श्रीगंगानगर परिसरात सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना तो जवान पकडला गेला होता.
सीमा ओलांडण्यामागे निष्पाप चूक
बीएसएफ जवान पूर्णम शॉ हे नुकतेच पंजाबच्या फिरोजपूर सीमेजवळ ड्युटीवर रुजू झाले होते. सीमेलगतच्या शेतकऱ्यांना मदत करताना ते अनावधानाने पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्या क्षणी पाकिस्तानी जवानांनी त्यांना अटक केली. अखेर २० दिवसांच्या ताब्यानंतर आज त्यांची भारतात सुरक्षितपणे परतफेर करण्यात आली. ही संपूर्ण घटना दोन्ही देशांतील सीमासंवेदनशीलतेचे व शांती प्रस्थापनेच्या गरजेचे महत्त्व अधोरेखित करते.











Comments are closed