India Morning News
नवी दिल्ली –
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत होणारा सर्व व्यापार तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून येणाऱ्या किंवा पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सर्व वस्तूंवरील आयात-निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
ही कारवाई 2 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आली असून, परराष्ट्र व्यापार धोरण 2023 अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पॅरा 2.20A च्या आधारे ही बंदी तात्काळ अंमलात आणली आहे. या निर्णयामुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानशी संबंधित सर्व वस्तूंच्या आयात आणि वाहतुकीवर पूर्णतः बंदी लागू झाली आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य-
सरकारच्या म्हणण्यानुसार, ही बंदी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक होती. जर कोणाला या बंदीपासून अपवाद हवा असेल, तर त्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.
एफटीपीच्या (Foreign Trade Policy) नवीन तरतुदीनुसार, पाकिस्तानातून येणाऱ्या कोणत्याही वस्तू—त्या थेट आयात होत असोत किंवा अन्य देशांमार्गे अप्रत्यक्षपणे—आता भारतात आणता येणार नाहीत. यामध्ये पूर्वी दिलेल्या विशेष परवानग्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम-
या निर्णयामुळे पाकिस्तानच्या आधीच डळमळीत असलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. भारताने यापूर्वी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर MFN (Most Favoured Nation) दर्जा काढून घेतला होता. त्यानंतर अटारी-वाघा सीमा बंद करणे, सिंधू पाणी करार स्थगित करणे, आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे ही पावले उचलण्यात आली होती.
ही व्यापारबंदी त्याच धोरणाची पुढची पायरी मानली जात आहे. यामुळे FATF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये पाकिस्तानवर दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










Comments are closed