India Morning News
मुंबई : पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून धडक प्रत्युत्तर दिलं. या मोहिमेत भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आणि समर्पण देशासाठी अभिमानास्पद ठरले. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसतानाही विजयाच्या जल्लोषाचे वातावरण तयार केलं जात असल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संयमाचे आवाहन केले आहे.
“देशासाठी शहीद झालेल्या जवानांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर सध्याच्या काळात संयम राखावा,” असे पत्रात नमूद करत अमित ठाकरे यांनी उत्सवांऐवजी संवेदनशीलता आणि सजगतेची गरज अधोरेखित केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले असले तरी सध्या फक्त युद्धविराम झाला आहे, विजय घोषित झालेला नाही, हे त्यांनी अधोरेखित केलं.
ते पुढे म्हणाले, देशात निर्माण झालेल्या परिस्थितीत आनंदोत्सव साजरा करणं अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहे. या क्षणी विजयाच्या घोषणा देण्याऐवजी शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि समाजात सजगता वाढवण्यावर भर दिला पाहिजे.
पत्राच्या शेवटी, अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, देशवासीयांच्या मनातील भावना समजून घेत संयमाने निर्णय घ्यावेत, अशी विनंती केली आहे.










Comments are closed