India Morning News
कुर्डुवाडी – सोलापूरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार सभेत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडीतील सभेत त्यांनी महिलांना उद्देशून केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.
सभेत गोरे म्हणाले, “मतदान २ तारखेला आहे. कुणाचाही पैसा घेतला तरी चालेल, पण मत भाजपलाच द्या. देवाभाऊंनी तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. इतकी इमानदारी तरी ठेवा. तुमचा नवरा देखील १०० रुपये सहज देत नाही; पण देवाभाऊंनी थेट खात्यात पैसे दिले.”
राखी पौर्णिमेचा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटले, “सख्खा भाऊ १०० रुपये देताना घराची परवानगी घ्यावी लागते. साडी देण्याचाही जमाना संपला. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५०० रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यात जमा करत आहेत. हे विसरू नका.”
यासोबतच, त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले की “त्यांच्या घरात पैशांच्या बॅगा भरून आल्या आहेत. ते पैसे घ्या, कारण ते तुमचेच आहेत—कमिशनमधून कमावलेले. पण मत मात्र भाजपलाच द्या.”
या विधानांनंतर निवडणुकीच्या तोंडावर मंत्री गोरे यांच्या भाषणशैलीवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली असून परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे.



