India Morning News
नागपूर, ता. १२: नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीकोनातून शहरातील विविध चौकांचा विकास करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मनपाच्या वाहतूक विभागाने सुरु केलेल्या कामाची पाहणी सोमवारी (१२ मे) केली. या प्रसंगी पोलिस उपायुक्त श्री अर्चित चांडक उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी मनपा अधिकाऱ्यांना वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, पायी चालणाऱ्या नागरिकांना सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे तसेच वाहतुकीला अडथळा येऊ नये, असे काम करण्याचे आदेश दिले.
आयुक्तांनी नागपूर विद्यापीठ वाचनालय चौक, रामदासपेठ पूल, बजाजनगर चौक दरम्यान होत असलेल्या विकास कामाची पाहणी केली. पोलिस उपायुक्त श्री चांडक यांनी वाहतुकीच्या दृष्टीने या विकास कामामध्ये दुरुस्ती सुचविली. मनपा आयुक्तांनी प्रकल्प विभागाकडून बजाज नगर येथे सुरू असलेल्या कामाच्या संथगतीवर नाराजी व्यक्त केली आणि कंत्राटदाराला नोटीस देण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांनी आणि पोलिस उपायुक्त यांनी मनपाच्या वाहतूक विभागातर्फे चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पार्किंगसाठी मार्किंग करणे, सूचना फलक लावण्याचे निर्देश दिले. त्यांनी रामदासपेठ येथे करण्यात आलेल्या कामावर समाधान व्यक्त केले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री रवींद्र बुंधाडे, श्रीमती अल्पना पाटणे श्री. विजय गुरुबक्षाणी, सह पोलिस आयुक्त श्रीमती माधुरी बाविस्कर, पोलिस इन्स्पेक्टर श्री अरविंद पुरी, श्री प्रवीण पांडे, मनपाच्या उपअभियंता श्री प्रमोद मोखाडे, राहुल देशमुख , कनिष्ठ अभियंता श्री मनोहर राठोड , श्री आनंद लमसोंगे,श्री हर्षल बोपर्डीकर व सल्लागार श्री प्रताप भोसले, उपस्थित होते.










Comments are closed