India Morning News
हैदराबाद: भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील प्रसिद्ध कराची बेकरीच्या बाहेर काही संघटनांनी आंदोलन छेडले. शमशाबाद परिसरातील या बेकरीसमोर निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी करत नाव बदलण्याची मागणी केली. हातात तिरंगा आणि गळ्यात भगवा स्कार्फ असलेल्या आंदोलनकर्त्यांनी दुकानाच्या फलकावर काठ्यांनी वार करत असंतोष व्यक्त केला.
तणावाचं वातावरण, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप-
निदर्शकांनी बेकरीसमोर गोंधळ घालत दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत जमाव पांगवून वातावरण शांत केले. या प्रकारामुळे बेकरीभोवती काही काळ तणावाचं वातावरण होतं. आरजीआय विमानतळ पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, ग्राहकांना त्रास देण्याच्या आरोपाखाली आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बेकरी मालकांनी घेतली सावधगिरीची भूमिका–
वादाची तीव्रता वाढत असल्याचं पाहता बेकरी व्यवस्थापनाने दुकानाबाहेरील फलकावरून ‘कराची’ हा शब्द झाकून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता फलकावर केवळ ‘बेकरी’ असा भाग दिसतो. या दरम्यान, दुकान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
बेकरी प्रशासनाकडून स्पष्टीकरण-
बेकरी व्यवस्थापनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ‘कराची बेकरी’ ही पूर्णतः भारतीय कंपनी असून तिचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. तरीसुद्धा नावावरून निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही.








Comments are closed