India Morning News
मुंबई: राज्यातील शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी सरकारने ‘कृषी समृद्धी योजना’ अंतर्गत तब्बल ₹५,६६८ कोटींचं अनुदान पॅकेज जाहीर केलं आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्रे आणि ट्रॅक्टर चालित रुंद सरी-वरंब (BBF) यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
कृषी विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, ही योजना पुढील तीन वर्षांसाठी राबवली जाणार आहे.
ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्रांसाठी अनुदान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “या योजनेचा उद्देश शेतीचे आधुनिकीकरण, पाणी साठवण वाढविणे, अचूक तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणे आणि शेतकऱ्यांना सामूहिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.”
योजनेतील चार प्रमुख घटक:
-
ट्रॅक्टर चालित रुंद सरी-वरंब (BBF) यंत्र
-
वैयक्तिक शेततळे
-
शेतकरी सुविधा केंद्रांची उभारणी
-
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना
निधीचे वाटप असे:
-
२५ हजार BBF यंत्रांसाठी: ₹१७५ कोटी
-
१४ हजार वैयक्तिक शेततळ्यांसाठी: ₹९३ कोटी
-
५ हजार शेतकरी सुविधा केंद्रांसाठी: ₹५,००० कोटी
-
५ हजार ड्रोनसाठी: ₹४०० कोटी
या उपक्रमामुळे राज्यभरातील २५ हजार BBF यंत्रे दर हंगामात १०० हेक्टर क्षेत्रावर काम करू शकतील. यंत्रामुळे पाण्याचा निचरा सुधारेल, मातीतील ओलावा टिकून राहील आणि पिकांच्या मुळांची वाढ सुलभ होईल, ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल.
ड्रोन तंत्रज्ञानामुळे खत आणि कीटकनाशक फवारणी अधिक अचूक, सुरक्षित आणि किफायतशीर पद्धतीने करता येईल.
वैयक्तिक शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना पाण्याचा साठा वर्षभर राखता येईल, तर शेतकरी सुविधा केंद्रांतून प्रशिक्षण, बी-बियाणे, यंत्रसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञान एकाच ठिकाणी मिळणार आहे.







