India Morning News
जळगाव :-
“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे,” अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मांडली.
मुक्ताईनगर येथे आयोजित आदिशक्ती मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर होते. विमानतळावर आगमनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “लाडकी बहीण” ही योजना महिलांसाठी मोठा आधार आहे. या योजनेसाठी सरकारकडून भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे तिला कोणताही धोका नाही.”
या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.
‘पिंक रिक्षा’ने दिला महिला सबलीकरणाचा संदेश:-
विमानतळावर आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महिला चालक रंजना सपकाळे यांच्या ‘पिंक रिक्षा’ने विमानतळ ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत प्रवास केला. या अनोख्या प्रवासातून त्यांनी महिलांच्या स्वावलंबनास प्रोत्साहन दिले. त्यांच्यासोबत मंत्री महाजन आणि पाटीलही होते.
पाऊस पडो, शेतकरी सुखी होवो:-
मुक्ताईनगरच्या पालखी सोहळ्यात सहभागी होताना शिंदे यांनी “राज्यात यंदा चांगला पाऊस पडो आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होवो,” अशी प्रार्थना पांडुरंग चरणी केली असल्याची माहितीही दिली.









Comments are closed