India Morning News
पुणे : टोल व्यवस्थापन आणि रस्ते प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या अकार्यक्षमतेवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट इशारा दिला आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, जर टोल कंत्राटदारांनी कामात कसूर केली, तर त्यांना थेट जेलमध्ये टाकलं जाईल.
गडकरी म्हणाले, आता टोल संकलनासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालाय. टोल नाके बंद झाले असून डिजिटल माध्यमातून संकलन चालू आहे. अशा परिस्थितीत कामात चुकारपणा करणाऱ्यांना माफ केला जाणार नाही.
या थेट इशाऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि खासगी कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
देशातच टनेल मशीनचं उत्पादन
गडकरी यांनी देशात ३ लाख कोटी रुपयांच्या टनेल प्रकल्पांची योजना असल्याचं सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, “सध्या टनेल मशीन चीनकडून आयात करावी लागते. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आता भारतातच हे यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे.”
तसंच, टनेल बांधणीसाठी AI आधारित प्रणाली आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.
पर्यायी इंधनाचं महत्त्व
गडकरी यांनी इथेनॉल, हायड्रोजन, CNG यांसारख्या पर्यायी इंधनाचा उल्लेख करत सांगितलं की, “मी स्वतः शेतात CNG ट्रॅक्टर वापरतो. देशातील वाहतूक आता इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधनाच्या दिशेने वळायला हवी.”
पुणे जिल्ह्यात ५० हजार कोटींचे प्रकल्प
गडकरी म्हणाले, पुणे जिल्ह्यात ५० हजार कोटींचे रस्ते आणि पूल प्रकल्प सुरू आहेत. यासाठी वेळेत आणि दर्जेदार काम करणं आवश्यक आहे.त्यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने देशात दर्जेदार अधोसंरचनेची उभारणी करण्याचा निर्धारही व्यक्त केला.






Comments are closed