India Morning News
मुंबई: महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीत जनतेच्या आणि कामगार वर्गाच्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करताना त्यांनी राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत महाराष्ट्राने मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरव केला.
“मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य हे आपल्या अस्मितेचा आत्मा आहे. ही संपत्ती पुढील पिढीपर्यंत पोचवणे आपले कर्तव्य आहे,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मराठी संस्कृतीच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्र ही शूरवीर, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. वैराग्य, ज्ञान, त्याग, प्रतिभा आणि कलाविष्कार यांचा अनोखा संगम या राज्याला लाभला आहे. प्रतिभावान नागरिक, मेहनती युवा पिढी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बळावर महाराष्ट्राने जागतिक पातळीवर स्वतःची ठळक ओळख निर्माण केली आहे.
कामगार दिनानिमित्त मुख्यमंत्री म्हणाले, “राज्याच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात कामगार वर्गाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.” सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित, समृद्ध आणि सुसंपन्न महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असली, तरी येणाऱ्या काळात सर्वसमावेशक विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. “प्रगत आणि संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कटिबद्ध होऊया,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.








Comments are closed