Shopping cart

  • Home
  • News
  • एम.डी. पावडर विक्रीसाठी बाळगणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई – २.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

एम.डी. पावडर विक्रीसाठी बाळगणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई – २.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 6, 20251 Mins Read
68

India Morning News

Share News:
Share

नागपूर – शहरात अंमली पदार्थांच्या गैरविक्रीवर लगाम आणण्यासाठी नागपूर शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून, एम.डी. (मेथेड्रॉन) पावडर विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून एकूण २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई आज पहाटे ६.०० ते ७.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, शास्त्री नगर, एन.आय.टी. ग्राउंड, वाठोडा टी-पॉईंट जवळ एक इसम एम.डी. पावडर विक्रीसाठी उभा आहे.

माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली असता, एक संशयित इसम मोपेडजवळ उभा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यास थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव विजय नंदलाल राहंगडाले (वय ४३, रा. संघर्ष नगर, वाठोडा रिंग रोड, नागपूर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे झिपलॉक पिशवीत एकूण २० ग्रॅम एम.डी. पावडर आढळली.

या कारवाईत पोलिसांनी एम.डी. पावडर, एक मोबाईल फोन, मोपेड गाडी, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, झिपलॉक पिशव्या आणि रोख रक्कम असा एकूण २,०३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने सदर एम.डी. पावडर शाहीद शेख (रा. यशोधरानगर, नागपूर) या साथीदाराकडून घेतल्याची कबुली दिली. तसेच तो हा पदार्थ प्रेमा राजेश गौर या इसमाला विक्रीसाठी देणार होता, असेही स्पष्ट झाले.

या प्रकरणी आरोपीवर एन.डी.पी.एस. कायद्यानुसार कलम ८ (क), २२ (क), २९ अंतर्गत नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक करून पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, अन्य दोन पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, उप पोलीस आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गजानन गुल्हाने व त्यांच्या पथकाने केली.

अशा प्रकारच्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस यंत्रणा सक्रिय असून, पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share