India Morning News
छत्तीसगडच्या दाट जंगलांमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवले. वर्षानुवर्षे सुरक्षा यंत्रणांना चकवा देणारा आणि नक्षल चळवळीचा मुख्य चेहरा बनलेला कुख्यात कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार झाला. त्याची पत्नीही या कारवाईत मारली गेल्याची पुष्टी झाली आहे.
माहितीनुसार, नक्षलप्रवण सीमावर्ती भागात डीआरजीच्या जवानांनी पहाटेपासून विशेष मोहीम राबवली. घनदाट जंगलात तासन्तास गोळीबार सुरू राहिला. या चकमकीत एकूण सहा नक्षलवादी ठार झाले असून त्यात हिडमा आणि त्याची पत्नी यांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बस्तर विभागातील सर्वाधिक भयानक आणि प्रभावी नक्षली कमांडर म्हणून ओळखला जाणारा हिडमा तब्बल एक कोटी रुपयांच्या बक्षिसाचा आरोपी होता. अनेक मोठ्या हिंसक कारवायांच्या कटांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला होता.
कर्रेगुट्टा पर्वतरांगांमधील काही महिन्यांपूर्वीच्या मोहिमेदरम्यान तो थोडक्यात बचावला होता; मात्र यावेळी तो पळू शकला नाही.
टॉप नक्षली नेता बसवा राजू ठार झाल्यानंतर माओवादी चळवळीचे नेतृत्व हिडमाकडे आले होते आणि त्याला संघटनेचा नवा सरचिटणीस नेमण्यात आले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू हा माओवादी संघटनेसाठी मोठा धक्का ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांच्या सलग कारवायांमुळे नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. मोठे कमांडर एकामागून एक निष्प्रभ होत असल्याने संघटनांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादाचा प्रभाव आणखी कमी होईल, असा विश्वास सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.






