India Morning News
रायगड : महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी जिल्ह्यातील राजकीय तणाव उफाळून आला आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळीच जोरदार खडाजंगी झाली. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीपर्यंत परिस्थिती बिघडली. यामध्ये जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच सुशांत जाबरे यांनी शिंदेसेना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता.
महाडमधील काही मतदान केंद्रांवर सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण होते. ईव्हीएम बंद पडल्यानंतर झालेल्या चढाओढीत समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. आरोप असेही आहेत की, या धुमश्चक्रीदरम्यान जाबरे यांना मारहाण झाली आणि त्यांनी गोगावले यांना बंदूक दाखवत धमकावल्याची चर्चा रंगली आहे.
या प्रकरणावर खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला.त्यांनी सांगितले की,मतदान शांततेत पार पडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मात्र काही तरुण नेते सकाळपासून मतदान केंद्रांत शिरून अधिकाऱ्यांशी वाद घालत होते. हे लोकशाहीच्या मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. महाडसारख्या सुसंस्कृत शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणे अक्षम्य आहे.”
तटकरे यांनी पुढे भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधत म्हटले की,हल्ला करणारे कोण आहेत याची सर्वांना कल्पना आहे. जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा माणसं गुंडगिरीकडे वळतात. प्रशासनाने पूर्वीच खबरदारी घ्यायला हवी होती.”
घटनेवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,रायगडमधील निवडणुकांचे वातावरण सर्वश्रुत आहे. महाडमध्ये दोन गट आमने-सामने आहेत. नेता म्हणून सौहार्द टिकवणे ही सर्वांची जबाबदारी होती. कार्यकर्ते पेटू नयेत याची काळजी घेतली असती तर हा संघर्ष उद्भवला नसता.”
महाडमधील हा संघर्ष निवडणूक वातावरण आणखी तापवत असून कोणावर कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



