India Morning News
मुंबई : अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. राज्यात एकूण २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून, यामध्ये १५ नव्या नगरपंचायतींचाही समावेश आहे.
निवडणुकीपूर्वी विरोधकांनी मतदार याद्यांतील घोळ आणि दुबार नोंदींवर आक्षेप घेतला होता. महाविकास आघाडी आणि मनसेने “प्रथम मतदार यादी स्वच्छ करा, मग निवडणुका घ्या,” अशी मागणी केली होती. मात्र आयोगाने विरोधकांच्या या मागणींकडे दुर्लक्ष करत निवडणुका जाहीर केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आयोगाने मतदार याद्यांतील दुबार नावे ओळखण्यासाठी एक अभिनव तांत्रिक उपाय सुरू केला आहे — ‘डबल स्टार प्रणाली’.
‘डबल स्टार’ म्हणजे काय?
राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये, दुबार नाव असण्याची शक्यता असलेल्या मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह दाखवले जाणार आहे. अशा प्रत्येक प्रकरणाची पडताळणी स्थानिक प्रशासनाकडून केली जाईल.
फोटो, पत्ता आणि लिंग पडताळणी:
ज्या मतदारांच्या नावासमोर हे चिन्ह दिसेल, त्यांच्या फोटो, पत्ता, नाव आणि लिंगाची तपासणी करून योग्य मतदान केंद्र निश्चित केले जाईल. यामुळे दुबार नोंदी असलेल्यांना केवळ एका ठिकाणीच मतदानाची परवानगी मिळेल.
प्रतिज्ञापत्र आवश्यक:
जर एखाद्या मतदाराचे नाव दोन ठिकाणी आढळले आणि त्याने “मी मतदान केलेले नाही,” असे सांगितले, तर त्याच्याकडून आयोगाने तयार केलेले प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. त्यात मतदार घोषित करेल की तो “या मतदान केंद्राशिवाय इतरत्र मतदान केलेले नाही आणि करणारही नाही.”
राज्य निवडणूक आयोगाचा हा ‘डबल स्टार’ उपक्रम आता चर्चेचा विषय ठरला आहे. या योजनेमुळे दुबार मतदारांची संख्या घटेल आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






