India Morning News
राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जाणा-या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महसूल विभागाने उध्वस्त झालेल्या, खरडलेल्या शेतीपाटांवर पुनर्वसनासाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गौण खनिजांवरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करण्यात आली असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.
पूर, मुसळधार पाऊस आणि नदीकाठच्या भागांत मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली आहे. काही ठिकाणी जमीन 10-15 फूट खोलपर्यंत खरडल्याचे निदर्शनास आले आहे. सोलापूरच्या सीनानदीने आपला प्रवाह बदलल्याने हजारो शेतकरी उध्वस्त झाले, तर राज्यातील इतर 30 जिल्ह्यांमध्येही खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार, सुमारे 42 लाख एकरांहून अधिक क्षेत्र अति पावसामुळे बाधित झाले. सोयाबीन, मका, कापूस, तूर, उडीद, मूग, भाज्या, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी, हळद या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक बाधित जिल्हे:
-
नांदेड – 7,28,049 हेक्टर
-
यवतमाळ – 3,18,860 हेक्टर
-
वाशीम – 2,03,098 हेक्टर
-
धाराशिव – 1,57,610 हेक्टर
-
अकोला – 1,77,466 हेक्टर
-
सोलापूर – 47,266 हेक्टर
-
बुलढाणा – 89,782 हेक्टर
सरकारच्या या निर्णयामुळे शेतजमिनी पूर्वपदावर आणण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






