India Morning News
नागपूर – राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असून नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्य सरकारने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदारांना मताधिकाराचा सहज वापर करता यावा हा उद्देश आहे.
या दिवशी कोकण (२७), नाशिक (४९), पुणे (६०), छत्रपती संभाजीनगर (५२), अमरावती (४५) आणि नागपूर (५५) विभागांतील एकूण २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ नागरिक मतदानासाठी पात्र असून ६,८५९ जागांसाठी आणि २८८ नगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक होईल. सर्व मतदान केंद्रांवर EVM यंत्रांचा वापर केला जाणार आहे.
यावेळी १० नव्या नगरपरिषद आणि १५ नव्या नगरपंचायती पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आहेत. अनेक ठिकाणी ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची पहिली मोठी निवडणूक असेल.
मतदार याद्यांतील पुनरावृत्ती शोधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दुबार नोंदींवर ‘डबल स्टार’ चिन्ह लावण्यात आले असून अशा मतदारांकडून मतदान केंद्रावर घोषणापत्र घेतले जाईल की त्यांनी इतर ठिकाणी मतदान केलेले नाही.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली असून आयोगाने नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान २ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.







