India Morning News
मुंबई – राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, १७ नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जांची छानणी १८ नोव्हेंबरला होईल, तर उमेदवारी माघार घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. या निवडणुकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवे नेतृत्व निवडले जाणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
निवडणूक आयोगाने सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारची आचारसंहिता भंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोगाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे.
या निवडणुकांमध्ये सुमारे २ कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार असून, ग्रामीण आणि निमशहरी भागातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यासारख्या मुद्द्यांवर उमेदवार मतदारांना आकर्षित करणार आहेत.





