India Morning News
मुंबई:पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पावले उचलली आहेत. भारतात विविध कारणांस्तव आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दिलेल्या अंतिम मुदतीचा शेवटचा दिवस असून, जो कोणी परत जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाकिस्तानी नागरिकांना शोधून बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे विधान केले आहे.
फडणवीस आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “गृहमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रात कोणताही पाकिस्तानी नागरिक लपलेला नाही. सर्व नागरिक सापडले आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची पूर्ण तयारी केली आहे. आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांची पाठवणी होईल.”
अनधिकृत फ्लेक्सवर कठोर कारवाई करणार
शहरांमध्ये अनधिकृत फ्लेक्स लावण्यावर आता सरकारने कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. फडणवीस म्हणाले, “कोणत्याही कार्यकर्त्यांनी जर माझ्या नावाने अनधिकृत फ्लेक्स लावले असतील, तर तेही तात्काळ काढून टाका. यामुळे शहरे विद्रूप होतात, त्यामुळे कठोर कारवाई अपरिहार्य आहे.”
राज्यात 5 हजारांपेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक-
राज्यभरात 5 हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक, तब्बल 2,458 नागरिक आहेत, तर ठाण्यात 1,106 नागरिकांची नोंद झाली आहे. मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्रे आहेत. यापूर्वी 107 नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले गेले होते, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा बातम्यांना फेटाळले आहे.










Comments are closed