India Morning News
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अन्य वरिष्ठ नेते स्वतः प्रचारात उतरले आहेत. या वातावरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला की महायुतीला ५१ टक्के मतदान मिळून स्पष्ट बहुमत मिळेल.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “मुंबईत भाजपाचे आकडे १०० च्या पुढे जातील आणि महायुती निश्चितपणे महापौर देईल.” त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि राज्यातील नागरिक विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत.
नागपूरमध्ये शरद पवार गटाने भाजप नेत्यांवर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. यावर बावनकुळे म्हणाले, “अशा प्रकारचे दडपण आमच्या संस्कृतीत नाही.”
पुण्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी शीतल तेजवानी यांना दिल्याचा आरोप असलेल्या ‘व्हीआयपी वागणुकी’चे त्यांनी खंडन केले. त्यांनी सांगितले की पोलिसांकडून माहिती मागवली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल.
मालेगावातील तीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावर त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. “अशा क्रूर कृत्याला मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा योग्य नाही,” असे ते म्हणाले.






