India Morning News
पुणे: दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकरणात रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात भादंवि कलम 106(1) अंतर्गत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या फेर तपासणी अहवालात वैद्यकीय निष्काळजीपणाचे ठोस पुरावे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून समितीचा दुसरा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, त्यात डॉ. घैसास यांच्याकडून उपचारात झालेली हलगर्जी स्पष्ट करण्यात आली आहे. या अहवालाच्या आधारे पोलीस विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्तालयाने सांगितले की, “ससून प्रशासनाला विचारण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अहवालात देण्यात आली असून, त्यामध्ये वैद्यकीय दुर्लक्ष झाल्याचे नमूद आहे. याच आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.”
पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, “ससून रुग्णालयाकडून तपशीलवार अहवाल मागवण्यात आला होता. डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या गंभीर अवस्थेला दुर्लक्ष केले आणि आवश्यक ती तत्काळ कृती केली नाही, असे स्पष्ट झाले. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
या प्रकरणातील पुढील तपास कायदेशीर मार्गाने करण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील. शासनाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, तनिषा भिसे या ७ महिन्यांची गर्भवती असताना २१ मार्च २०२५ रोजी त्यांना इंदिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना २८ मार्च रोजी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ. घैसास यांच्यावर पूर्वी उपचार घेतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तब्बल साडेपाच तास कोणतीही गंभीर वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
संपूर्ण तपासाअंती सत्य निष्पन्न होईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











Comments are closed