India Morning News
नागपूर: महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा वादळ उठले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेतृत्वावर थेट प्रश्न उपस्थित करत एक गंभीर मुद्दा उचलला संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला का होऊ शकत नाही? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनीही थेट पाठिंबा दर्शवला. संघाने एकदा दलित सरसंघचालक नेमून दाखवावा, असे ठाकरे म्हणाले. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेसची भूमिका – समावेशाच्या राजकारणाची पाठराखण-
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यात काँग्रेसच्या सामाजिक समावेशाच्या परंपरेचा उल्लेख केला. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष दलित आहे, देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना कायदा मंत्रीपद दिले गेले, हे दाखवत त्यांनी भाजप व संघ परिवाराच्या नेतृत्ववर्गातील सामाजिक एकतेवर सवाल केला.
संघाची रचना – बदलाची गरज?
RSS ही देशातील एक प्रभावी संघटना आहे, पण तिच्या नेतृत्वात आजपर्यंत एकाही दलित, मुस्लीम किंवा महिलेला सर्वोच्च स्थान मिळालेले नाही. हा मुद्दा केवळ राजकीय टीका नसून देशाच्या सामाजिक न्यायाच्या ध्येयाशी संबंधित आहे. संघाने अनेकदा ‘एकात्मता’ आणि ‘हिंदू समाज एक’ याचे गोड गोड भाषण दिले असले, तरी त्याच्या नेतृत्वात विविधता दिसून येत नाही, हे वास्तव आज अनेकांना खटकते.
मोदी सरकारवर थेट आरोप-
सपकाळ यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात एकाही मुस्लीम महिलेला मंत्रीपद नाही, एकाही दलिताला खऱ्या अर्थाने उच्च स्थान दिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मॉब लिंचिंग, दलितांवरील अत्याचार, धार्मिक ध्रुवीकरण या घटनांचा संदर्भ देत मोदी सरकारवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
‘खरा इतिहास झाकता येणार नाही’
बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर संघाच्या भूमिकेवरही सपकाळ यांनी सवाल केला. “रामलीला मैदानावर बाबासाहेबांचे संविधान जाळणाऱ्यांना मोदी ओळखत नाहीत का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी खोटा इतिहास सांगून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.
प्रश्न केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक न्यायाचा-
हा वाद केवळ काँग्रेस व भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष नाही, तर तो भारतातील नेतृत्वातील सामाजिक समावेशाच्या अभावाची वेदना दर्शवतो. जर संघ देशभर ‘हिंदू समाज एक आहे’ असे सांगतो, तर मग त्याच्या सर्वोच्च पदावर एक दलित, मुस्लीम किंवा महिला का नाही?
उद्धव ठाकरे व हर्षवर्धन सपकाळ यांचा हा सवाल केवळ संघालाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय समाजाला आत्मपरीक्षणासाठी भाग पाडणारा आहे. नेतृत्वात सामाजिक विविधता दिसणे ही एक गरज बनली आहे तो राजकारणासाठी नव्हे, तर लोकशाहीच्या खरीखुरी मूल्यांची जपणूक करण्यासाठी आहे.








Comments are closed