India Morning News
पिंपळे सौदागर : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे ३ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर घडलेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येने संपूर्ण समाज हादरला आहे. या नराधम कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन व पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने रविवारी बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर संताप सभेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांपासून लहान मुलांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी या सभेला उपस्थिती दर्शवली.
सभेची सुरुवात चिमुकलीला दोन मिनिटांचे मौन व श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी एकमुखाने आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच बालसुरक्षेसाठी समाज म्हणून अधिक जागरूक राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी संतप्त शब्दांत म्हटले, ‘‘तीन वर्षांच्या निष्पाप बाळावर असा राक्षसी अत्याचार करणारा माणूस नाही, तो नराधम आहे. अशा गुन्हेगारांना कडकात कडक म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. समाजात कायद्याची भीती निर्माण करायची असेल तर अशा घटनांमध्ये दाखला घालूनच शिक्षा करावी लागेल. एक चिमुकली गमावली ही वेदना केवळ त्या कुटुंबाची नव्हे, तर आपल्या सर्वांचीच आहे.’’
याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, मीनाक्षीताई देवतारे, विठाई वाचनालयाचे सभासद, आनंद हास्य क्लबचे सदस्य, ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच पिंपळे सौदागर परिसरातील संवेदनशील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



