India Morning News
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदाच्या दिवाळी सणात विक्रमी कमाईचा नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 10 दिवसांत तब्बल ₹301 कोटींचे उत्पन्न मिळवत एसटीने सुवर्ण कामगिरी केली आहे. या यशात पुणे विभागाने ₹20.47 कोटींची कमाई करत राज्यात पहिले स्थान पटकावले आहे.
धुळे विभागाने ₹15.60 कोटी, तर नाशिक विभागाने ₹15.41 कोटींचे उत्पन्न मिळवले असून या विभागांनीही चांगली झेप घेतली आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही कामगिरी “अभिमानास्पद” असल्याचं सांगत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं.
18 ते 27 ऑक्टोबर दरम्यान दिवाळीच्या प्रवासामुळे एसटीला दररोज सरासरी ₹30 कोटींचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे, 27 ऑक्टोबर रोजी तब्बल ₹39.75 कोटींची कमाई करून एसटीने यंदाच्या वर्षातील सर्वाधिक दैनंदिन महसूलाचा विक्रम केला.
गेल्या वर्षाच्या तुलनेत ₹37 कोटींची वाढ झाल्याचं एसटी प्रशासनाने सांगितलं आहे. प्रवाशांची वाढलेली मागणी, विशेष फेऱ्या आणि वेळेवर सेवा या कारणांमुळे ही वाढ झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
तथापि, मंत्री सरनाईक यांनी सांगितलं की, एप्रिल आणि मे वगळता काही महिन्यांत एसटीला ₹150 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. अवकाळी पाऊस, पूरस्थिती आणि प्रवाशांची घटलेली संख्या ही त्यामागची प्रमुख कारणं होती. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या काळात नफा वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं.
ऑक्टोबर महिन्यासाठी ₹1049 कोटींच्या महसूलाचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. जरी काही दिवस ते गाठता आलं नाही, तरी पुणे, बीड, अमरावती आणि बुलढाणा विभागांनी चांगली कामगिरी दाखवली. याउलट सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि धाराशिव विभागांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने एकूण उत्पन्नावर परिणाम झाला.
सरनाईक म्हणाले, “तोट्यातील विभागांचं मूल्यमापन करून त्यांची कार्यपद्धती सुधारावी लागेल. सर्व विभागांनी जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम केलं, तर एसटी पुन्हा नफ्यात आणता येईल.”
शेवटी, दिवाळीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करत त्यांनी म्हटलं, “प्रवाशांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी हीच खरी जनसेवा आहे.”








